रविवार, १७ मार्च, २०२४

गाठोडे


गाठोडे

******

शिणलेले पाय अंधारल्या वाटा

परि भोगवटा सरेचिना ॥ 

कायअसतात खोट्या साऱ्या कथा

 सजवल्या व्यथा  वरवर ॥ 

संपतील श्वास जरी वाटे जीवा 

आयुष्याचा ठेवा डोईजड ॥

सुखाच्या शोधात चालला प्रवास .

उसवतो श्वास अडविता ll 

म्हण दत्त दत्त आटवीत रक्त 

रिते करी चित्त साऱ्यातून ॥

झाले तर झाले किंवा वाया गेले 

जन्म आले गेले बहुसंख्य ॥

विक्रांत गाठोडे फार नाही मोठे

परी खरे खोटे ठाव नाही ॥ 

🌾🌾🌾


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

https://kavitesathikavita.blogspot.com  .

☘☘☘☘ 🕉️ 


 

शनिवार, १६ मार्च, २०२४

अभीर

अभीर
******
निरागसतेच्या प्रसन्न वेलीवर 
अंकुरलेली कळी
उन्मलित न झालेली  
स्व भानाचा डंख न झालेली 
अहमचे केंद्र नसलेली 
मानवी जीवनातील
सर्वोत्कृष्ट स्थिती

गौर कोमल काया 
प्रसन्न मुग्ध हास्य 
सर्व जगाचे 
स्थळ काळ व्यक्तीचे 
आकर्षण करणारे डोळे 
अन् जगत मित्राची अलिखित 
उपाधी मिरवणारी 
ती अबोध निसंगता 

त्या तुझ्या आभा मंडलात 
दाटलेली मंद चंद्र कला
स्निग्ध रुपेरी  किरणांच्या
हळुवार वर्षावात 
प्रसन्नतेने बहरलेले 
प्रत्येक हृदय 

तुझ्या अस्तित्वाने 
बांधले गेलेले कितीतरी 
चिरपरिचित अपरिचित  
व्यक्तिमत्व होती तेव्हा
तिथे त्या सोहळ्यात 
सारे तुला आशिष देत होती 
कौतुक करत होती
पण मला मात्र जाणवत होती
फक्त तुझी शुभेच्छा
तुझ्या अस्तित्वातून  
प्रत्येक हृदयात झिरपणारी
कळत नकळत
कालातित सुखाची आनंदाची 
क्षणस्थ अवकाशाची
मंगलमय वर्षाव करणारी.
म्हणून तुला पुन: पुन्हा 
धन्यवाद आणि आशीर्वाद .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

ओंजळ

ओंजळ
*******
जीवन हातातून 
ओघळून गेले आहे 
आता फक्त काहीसे 
हात ओले आहे 
पण ती ओल ही 
नाही भागवत तहान 
कोणाचीही 
अगदी स्वतःची ही 
ती तिची साथ 
तीही आहे 
क्षणिक आता 
पाहता पाहता  जात आहे  
उडून वाफ होऊन 
त्याचे दुःख मला नाही 
त्याबद्दल वाईटही वाटत नाही 
ते क्रमप्राप्तच आहे 
पण खंत एवढीच आहे की 
ती ओंजळ भरली होती तेव्हा 
मला कोणाच्या पायावर 
वाहता आली नाही 
सर्वस्वाने सर्वार्थाने
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १४ मार्च, २०२४

सुटले


सुटले
****
विसरला पथ हरवला गाव 
कोमेजले शब्द मावळला भाव ॥१

सुटले कीर्तन सरले गायन 
उतरली नशा जाणीवेत मन ॥२

फुटला मृदुंग तुटला रे टाळ 
हरला हव्यास मनातला जाळ ॥३

अंतहिन थांबे अर्थहीन खेळ 
धावणे नुरले उगा रानोमाळ ॥४

सुटता सुटले दाटलेले कोडे
अतृप्तीत मग्न दिसे मन वेडे ॥५

लाटावर लाटा बेभान अनंत 
स्तब्ध खोल शांत डोह अंतरात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १३ मार्च, २०२४

रुक्मिणीचे पत्र


रुक्मिणीचे पत्र 
************
सागराच्या पलीकडे तुझे घर आहे म्हणे 
लाटा लाटातून येते नित्य तुझे बोलावणे ॥१
मिटताच डोळे माझे  मनोहर रूप दिसे
पुनवेच्या चांदराती सुनिल अंबर जैसे ॥२
लहरत वाऱ्यावर रम्य तुझ्या कथा येती 
तुझे गुण कीर्ती मनी मधुरस उधळती ॥३
म्हणतात साऱ्याजणी रूप गुण संपन्न मी 
तुजविण मज साठी अन्य वर नाही कुणी ॥४
मनोमनी गाठ मग तुजशी मी बांधते रे 
रात्रंदिन ध्यास तुझा तुझ्यातच रंगते रे ॥५
प्रियजन परिणय अन्य कुठे इच्छताती 
सोडूनिया वनराज वृका कुणा शोधताती ?॥६
तुझ्या लीला अवखळ तुझे दिव्य यशोगाण
ऐकताना रात्रंदिन चित्त जाते हरखून ॥७
प्राणातील हाक माझी कानी तव येईल का ?
निरोपाचे पत्र येता धावूनी तू येशील का ? ॥८
हवे तर ने वरुनी हवे तर पळवूनी 
तुजविण नको मज अन्य काही रे जीवनी ॥९
येरे घनश्यामा ये रे नील मेघा सम ये रे 
अन् माझ्या प्रीतीफुला नव संजीवन दे रे ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सता


सत्ता
*****
तयांच्या मनात इवलेसे स्वप्न 
इवल्या स्वप्नात दिसे सिंहासन ॥
इवलीशी गादी सुटता सुटेना 
सत्तेची तहान भागता भागेना ॥
काय कोणा हाती असते रे सत्ता 
अवघ्याचा दाता देव देता घेता ॥
पाहुनी लाथाळी हसू फुटे चित्ता 
कसा खेळविसी तू रे इथे दत्ता ॥
हौस पुरविशी तूच देवराया
कर्मगुणे तया देऊनिया खाया ॥
तरी न भरते कुणाचेच पोट
एकावर एक ताटावर ताट ॥
अंतरी वळली तीच वाट बरी 
चालणे निवांत घेऊनिया झोळी ॥
राजा नच व्हावे कधी रे वेड्यांचा 
भिकारी बरा तो नर्मदा तीरीचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, १२ मार्च, २०२४

प्राणसखा


प्राणसखा
********

स्पर्श सावळा देही भरला
जन्म सुखाचा डोह जाहला ॥१
प्राणा मधला सूर कोवळा
कुण्या ओठाला हळू स्पर्शला ॥२
अन  श्वासांचे होउन गाणे
झाली गंधीत अवघी राने ॥३
कुठे तळ नि कुठे  किनारा
सर्वागावर मोरपिसारा ॥४
कोण असे तू माझ्यामधला 
अंतरबाह्य धुंद एकला  ॥५
प्राणाकार तू प्राण विसावा
प्राणसखा तू दीठी दिसावा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गाठोडे

गाठोडे ****** शिणलेले पाय अंधारल्या वाटा परि भोगवटा सरेचिना ॥  कायअसतात खोट्या साऱ्या कथा  सजवल्या व्यथा  वरवर ॥  सं...