सोमवार, २९ एप्रिल, २०२४

खोके

खोके
*****
दत्ताच्या द्वारी आपटून डोके 
रिते कर खोके ज्ञानाचे ते ॥

अगा भरलेला आतमध्ये भुसा 
कोण जाणे कसा ठासूनिया ॥

काही भिजलेला काही कुजलेला 
काही घट्ट झाला कशाने तो ॥

कळत कधी वा कधी न कळत 
राहिला भरत व्यर्थपणे . ॥

घेई भाव फुले ठेवी रे तयात 
धुंद आसमंत करूनिया ॥

रोज होई रिक्त रोज होई मुक्त 
महा शून्य भक्त परिपूर्ण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २८ एप्रिल, २०२४

घ्यावे जगून

घेई जगून
********

जाण्याआधी हातातून 
जीवन आपल्या निसटून 
आषाढाचा पाऊस होऊन
धुंदपणे  घ्यावे जगून 

क्षणोक्षणी आनंदाचे 
झरे येतात उफाळून
 दगड थोडे माती थोडी 
ठेव जरा बाजूस करुन . 

फार काही अवघड नाही 
फक्त प्रवाही वाहत राही 
प्रवाहातील प्रतिबिंबात 
हरखून आणि हरवून जाई 

मैत्र भेटतील कधी जीवाचे 
जीव त्यावर देई उधळून 
सुखदुःखाचे क्षण इवले 
घे तयाला घट्ट कवळून 

भय पापाचे अन पुण्याचे 
होत निरागस दे उधळून 
पद प्रतिष्ठा जा विसरून 
आनंदाचा कण तू होऊन 

जे लाभले त्या कृतज्ञ होऊन 
जे गेले त्या निरोप देऊन 
या क्षणातील चिरंतनाशी 
नाते आपले घेई जुळवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

दत्त शब्द

दत्त शब्द
*******
दत्त दत्त दत्त दोन शब्द फक्त 
राहो अंतरात निनादत ॥१

दत्त दत्त दत्त हृदयी स्पंदन 
राहो कणकण उद्गारत ॥२

दत्त दत्त दत्त सोहम श्वासात 
सहस्त्रवारात वसो नित्य ॥३

दत्त दत्त दत्त पडावे कानात 
स्वर अनाहत स्वयंपूर्ण ॥४

दत्त दत्त दत्त व्हावे निजरूप 
भरून स्वरूप  नुरो अन्य ॥५

दत्त दत्त दत्त शब्द कृपावंत 
विक्रांत मनात रुजो खोल ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

होशी दत्ता

होशील दत्ता
*********
कुणासाठी होशी दत्ता तू रे देव 
स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१

कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ 
कृपाळ प्रेमळ लीलाधर ॥ २

कुणासाठी होशी तूच गुरुदेव 
उपदेशी ठाव पदी देशी ॥३

कुणासाठी धावे रक्षक होऊन 
विपत्ती हरून तारी कुणा ॥ ४

कुणासाठी सखा होशी सवंगडी 
देई लाडीगोडी सुख सारे ॥ ५

माझ्यासाठी कधी होशील तू मी रे
हरवून सारे दृश्यभास ॥ ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

सुटू द्यावे

सुटू द्यावे
*******
असते सदैव 
साथ का कुणाची 
सुटतात हात सुटू द्यावे ॥

खेळ जीवनाचा 
पहायचा किती 
मिटतात डोळे मिटू द्यावे ॥

हातात नभाच्या 
असतेच काय 
फुटतात मेघ फुटू द्यावे ॥

येता ऋतूराज 
फुलतात वृक्ष 
जगतास गंध लुटू द्यावे ॥

सरताच ऋतू 
गळतो बहर
विटतात रंग विटू द्यावे ॥

येताच भरून 
सुचतेच गाणे 
हृदयात दुःख उमटू द्यावे ॥

सुखाचे दुःखाचे 
चीर जीवनाचे 
मनाला तयात लपेटू द्यावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


बुधवार, २४ एप्रिल, २०२४

दत्त बडवतो


दत्त बडवतो
*********
दत्त बडवतो मज बडवू दे 
दत्त रडवतो मज रडवू दे 
फटका बसता जागृती येता
कुठे जायचे मज कळू दे  ॥१

प्रवाही वाहून फुटणे घडते
छन्नी साहून आकार उमटे 
चुकता चुकता चुकले कळते 
मागचे मागुते मग सरू दे ॥२

आईचे मारणे मारणे दिसते 
प्रेमच त्यात ना दडले असते
जन्म जन्मीचे साठले वाढले
कृपेने त्याच्या प्रारब्ध सुटू दे ॥३

जयाच्या संकल्पे विश्र्व जन्मते
आणिक विकल्पे लयास जाते
तयाचे सुखकर आनंद गर्भ ते
दुःख इवलसे येवून भिडू दे ॥४

देह ना माझा नच हे मन ही
भोगणारा सदा पाहत राही 
पाहता पाहता आकाश मधले
पाहण्याऱ्याल्या गिळून घेवू दे ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

मारूत

मारुत
****** 
एक रुद्र हुंकार 
भेदत जातो सप्त पर्वत 
पृथ्वी आप तेज वायू 
सारे आकाश व्यापत 
थरथरते धरती ढवळतो सागर 
उफाळून लाव्हाग्नी 
स्थिरावतो नभावर 
मग शब्दांचे पडघम वाजवत 
डम डम डम करत 
जातो विस्तारत ओमकार होत 
त्या परमशून्याला 
कडकडून भेटत
आपले अस्तित्व हरवत 
तो राम आराम विश्राम 
त्याच्याशी एकरूप होत 
मग उतरतो खाली 
असले पण हरवत 
आपले पण मिटवत 
ती महाभक्ताची न मागितलेली 
बिरुदावली मिरवत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


खोके

खोके ***** दत्ताच्या द्वारी आपटून डोके  रिते कर खोके ज्ञानाचे ते ॥ अगा भरलेला आतमध्ये भुसा  कोण जाणे कसा ठासूनिया ॥ काही भिजलेला...