शनिवार, ४ मे, २०२४

खूण

खूण
****
मनाच्या कपाटी जपून ठेवला
बंद कुलुपात कुणा न दाविला ॥

तोच तो राजस सुंदर चेहरा 
अति मनोहर लोभस हसरा  ॥

कुणी ग चोरला कुणी ग लुटला 
होता जन्मभर खजिना जपला ॥

जाऊन गुरूला वृत्तांत वदला
वंदून पदाला उपाय पुसला  ॥

तोच ग अंतरी प्रकाश दाटला 
 सखा सर्वव्यापी सर्वत्र दिसला ॥

देई ज्ञानदेव खुण ती मजला
भ्रांतीत पडला जीव सुखावला ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ३ मे, २०२४

वाटा

वाटा
******
 वाटा देहाच्या मनाच्या 
कशा कळाव्या कुणाला .
रोज नकार तरीही 
दाटे प्रतिक्षा डोळयाला

स्मृती आनंदाची तीच
शोधे त्याच त्या सुखाला 
बंद दरवाजे तरी 
मन ठोठावे कडीला 

चाचपडत चालला 
खुळ्या आंधळ्याचा शोध 
नाही पाहीला किरण 
कसा होणार रे बोध 

देह मातीचा मातीला 
मन वाऱ्याचे वाऱ्याला 
गंध कुठून हा आला 
या रे मृगाच्या सरीला

कुठे भिजलेले स्वप्न 
कुण्या डोळा ओघळले 
सारे सांडून आभाळ 
प्राण श्वासात भरले 

मन मिटल्या एकांती 
शब्द श्वासात विरले
देणे सरले जन्माचे 
मागे कोणी न उरले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २ मे, २०२४

नट

नट
****
ज्याचा पैशावर डोळा जो पद करी गोळा 
काय करावे त्या गबाळा सांभाळून ॥
ज्याचा रुबाब इवला दिसे उसना घेतला 
काय करावे त्या नटाला वाखाणून ॥
त्याचे बोलणे चतुर दावी अभ्यास भरपूर 
काय करावे त्या फितूर लबाडाला ॥
ज्याने लुटले जगाला स्वतः मारून मनाला 
काय करावे त्या कुटाळ पाषाणाला ॥
त्याने विकले इमान वर मिरवी महान 
जन्म ठेवला गहाण ज्याने सैतानाला ॥
देह विकूनिया दासी पोशी घरा नि दाराला
तिचे अर्जन कष्टाचे तिच्या लागावे पदाला  ॥
नको याची रे संगत देवा देऊस पंगत 
नको लावूस हि पीडा मोले घ्यावयाला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

कळवळा

कळवळा
*******
अडकले चित्त सुखात दुःखात 
संसार भोगात जडवत ॥

दीपाचे दीपक स्वयं प्रकाशक 
मागतात भीक दारो दारी ॥

अन रिक्ततेची लागुनी टोचणी
शीणती शोधूनी सैरावैरा ॥

मग श्रीपादाला येई कळवळा 
माऊलीचा लळा जैसा बाळा ॥

अद्वैताचे प्रेम पाजूनिया जगी
पुन्हा नेइ वेगी स्वस्थानाशी ॥

दावुनिया खेळ सगुण निर्गुण 
चिन्मयाची खूण पटवतो ॥

सांगतात संत असे ग्रंथातरी 
विश्वास त्यावरी ठेवा सदा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

खोके

खोके
*****
दत्ताच्या द्वारी आपटून डोके 
रिते कर खोके ज्ञानाचे ते ॥

अगा भरलेला आतमध्ये भुसा 
कोण जाणे कसा ठासूनिया ॥

काही भिजलेला काही कुजलेला 
काही घट्ट झाला कशाने तो ॥

कळत कधी वा कधी न कळत 
राहिला भरत व्यर्थपणे . ॥

घेई भाव फुले ठेवी रे तयात 
धुंद आसमंत करूनिया ॥

रोज होई रिक्त रोज होई मुक्त 
महा शून्य भक्त परिपूर्ण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २८ एप्रिल, २०२४

घ्यावे जगून

घेई जगून
********

जाण्याआधी हातातून 
जीवन आपल्या निसटून 
आषाढाचा पाऊस होऊन
धुंदपणे  घ्यावे जगून 

क्षणोक्षणी आनंदाचे 
झरे येतात उफाळून
 दगड थोडे माती थोडी 
ठेव जरा बाजूस करुन . 

फार काही अवघड नाही 
फक्त प्रवाही वाहत राही 
प्रवाहातील प्रतिबिंबात 
हरखून आणि हरवून जाई 

मैत्र भेटतील कधी जीवाचे 
जीव त्यावर देई उधळून 
सुखदुःखाचे क्षण इवले 
घे तयाला घट्ट कवळून 

भय पापाचे अन पुण्याचे 
होत निरागस दे उधळून 
पद प्रतिष्ठा जा विसरून 
आनंदाचा कण तू होऊन 

जे लाभले त्या कृतज्ञ होऊन 
जे गेले त्या निरोप देऊन 
या क्षणातील चिरंतनाशी 
नाते आपले घेई जुळवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

दत्त नाम

दत्त शब्द
*******
दत्त दत्त दत्त माझ्या अंतरात
राहो  निनादत नाम फक्त ॥१

दत्त दत्त दत्त हृदयी स्पंदन 
राहो कणकण उद्गारत ॥२

दत्त दत्त दत्त सोहम श्वासात 
सहस्त्रवारात वसो नित्य ॥३

दत्त दत्त दत्त पडावे कानात 
स्वर अनाहत स्वयंपूर्ण ॥४

दत्त दत्त दत्त व्हावे निजरूप 
भरून स्वरूप  नुरो अन्य ॥५

दत्त दत्त दत्त शब्द कृपावंत 
विक्रांत मनात रुजो खोल ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


खूण

खूण **** मनाच्या कपाटी जपून ठेवला बंद कुलुपात कुणा न दाविला ॥ तोच तो राजस सुंदर चेहरा  अति मनोहर लोभस हसरा  ॥ कुणी ग चोरला कुणी ...