गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

सुटू द्यावे

सुटू द्यावे
*******
असते सदैव साथ का कुणाची 
सुटतात हात सुटू द्यावे ॥

खेळ जीवनाचा पहायचा किती 
मिटतात डोळे मिटू द्यावे ॥

हातात नभाच्या असतेच काय 
फुटतात मेघ फुटू द्यावे ॥

येता ऋतूराज फुलतात वृक्ष 
जगतास गंध लुटू द्यावे ॥

सरताच ऋतू गळतो बहर
 विटतात रंग विटू द्यावे ॥

येताच भरून सुचतेच गाणे 
हृदयात दुःख उमटू द्यावे ॥

सुखाचे दुःखाचे चीर जीवनाचे 
मनाला तयात लपेटू द्यावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


बुधवार, २४ एप्रिल, २०२४

दत्त बडवतो


दत्त बडवतो
*********
दत्त बडवतो मज बडवू दे 
दत्त रडवतो मज रडवू दे 
फटका बसता जागृती येता
कुठे जायचे मज कळू दे  ॥१

प्रवाही वाहून फुटणे घडते
छन्नी साहून आकार उमटे 
चुकता चुकता चुकले कळते 
मागचे मागुते मग सरू दे ॥२

आईचे मारणे मारणे दिसते 
प्रेमच त्यात ना दडले असते
जन्म जन्मीचे साठले वाढले
कृपेने त्याच्या प्रारब्ध सुटू दे ॥३

जयाच्या संकल्पे विश्र्व जन्मते
आणिक विकल्पे लयास जाते
तयाचे सुखकर आनंद गर्भ ते
दुःख इवलसे येवून भिडू दे ॥४

देह ना माझा नच हे मन ही
भोगणारा सदा पाहत राही 
पाहता पाहता आकाश मधले
पाहण्याऱ्याल्या गिळून घेवू दे ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

मारूत

मारुत
****** 
एक रुद्र हुंकार 
भेदत जातो सप्त पर्वत 
पृथ्वी आप तेज वायू 
सारे आकाश व्यापत 
थरथरते धरती ढवळतो सागर 
उफाळून लाव्हाग्नी 
स्थिरावतो नभावर 
मग शब्दांचे पडघम वाजवत 
डम डम डम करत 
जातो विस्तारत ओमकार होत 
त्या परमशून्याला 
कडकडून भेटत
आपले अस्तित्व हरवत 
तो राम आराम विश्राम 
त्याच्याशी एकरूप होत 
मग उतरतो खाली 
असले पण हरवत 
आपले पण मिटवत 
ती महाभक्ताची न मागितलेली 
बिरुदावली मिरवत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


महापुरुष

.महापुरुष 
****
महापुरुष बरे असतात 
जन्मदिवस पुण्यतिथी 
साजरे करण्यासाठी 
हार माळा फुले 
फोटोवर पुतळ्यावर
उधळून गाणी गाण्यासाठी 
महापुरुषाचे विचारधन 
नको असते कोणाला
जातीजमातीत वंशात 
उभा करून त्याला 
राहायचे असते लोकांना 
कारण आकाशात उडून 
अथांग आकाश होता 
येत नसते त्यांना 
तो त्याग ती तपस्या ते दुःख 
ती वेदना झेपत नसते त्यांना 
खरंतर कधी कधी ती 
एक गरजही असते त्यांची 
आपले इवलाले स्वार्थ 
महत्त्वकांक्षा पुऱ्या 
करून घेण्यासाठी
एक कळप एक झुंड 
एक दहशत निर्माण करण्यासाठी 
बऱ्याच वेळेला 
त्या झेंडा खाली जमणे 
हे नाईलाजाचे असते 
एक ओढवून घेतलेली 
जबरदस्ती असते त्यांच्यावर 
कारण जीवनाचे 
बळी तो कान पिळी 
हे सूत्र भिववत असते त्यांना 
हे सूत्र माहीत असते त्यांना 
दिसत असते त्यांना 
म्हणूनच महापुरुषाचे प्रतिमापूजन
 हे एक बळाचे साधन 
म्हणून स्वीकारून
 प्रत्येक वंश धर्म समाज गट 
स्वतःलात फसवून
त्यांचा अनुयायी म्हणून 
मिरवत असतात
अन त्या युगपुरुषाला खुजे करून 
तट बांधत असतात पुढारी 
दऱ्या वाढवत असतात राजकारणी 
साऱ्यांनाच दिसत असते 
कळत असते  
पण स्वार्थापुढे कोणाचेच 
काही चालत नसते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

आरसा

आरसा
******
तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो
वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो 

कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो 
मी तुला खुश करतो का मीच खुश होतो 

तू सुखाचा आरसा समोर माझ्या ठेवला सुखदुःखात तुझ्या माझाच चेहरा नटला 

हे असणे कुणासाठी हे नसणे कुणाविन 
ते चांदणे कुणातील मज वेढून रात्रंदिन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

तुझ्यासाठी


तुझ्यासाठी
*********

मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार
सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१

डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या पथी अंथरते 
भावनांची भावफुले शब्द गंध शिंपडते ॥२

सांग कसे लपवू या देहातीला खाणाखुणा 
कसा बाई अडखळे शब्द ओठी फुटतांना ॥३

तुला डोळी पाहतांना काळजाचे पाणी होते 
तुझा स्पर्श होता क्षणी भान देहा पार जाते ॥४

मिटता च डोळे तुझे दिव्य रूप साकारते 
उघडता व्याकुळता गालावरी ओघळते ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी
**************
भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर 
भावनांनी उर भरू येई ॥१ 

आहाहा किती रे भाग्याचे पाईक 
पातले जे सुख पायी तुझ्या ॥२

किती भाव भक्ती किती समर्पण 
अर्पिले जीवन ज्यांनी तुला ॥३

तयांच्या पदाची धूळ घ्यावी भाळी 
भक्ती भारलेली कणभर ॥४

अशा वेडाविन काय तू रे भेटे 
सुटतील वेढे जन्माचे या ॥५

ऐसिया भक्तांची सदा पडो गाठ 
दिसो तुझी वाट मजलागी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...