बुधवार, १७ एप्रिल, २०२४

श्रीराम प्रार्थना


श्रीरामास प्रार्थना
**********
अयोध्येत पुन्हा विराजमान झाल्यानंतर 
हे रामराया, हा तुझा पहीला जन्मदिवस 
अतिशय गौरवशाली मूल्यवान 
आणि तो पाहणारे आम्हीही भाग्यवान 

खरंतर जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन करून 
भेट द्यायची असते उत्सव मुर्तीला
पण मी मात्र बोलणार आहे तुझ्याशी 
आणि मागणार आहे तुझ्याकडून काहीतरी .

अनंत कालरुपी सत्तेने अस्तित्वात 
असलेला तू
तुझ्या हिशोबी हा काळ असेल .
टिचभर इवलासा .
पण आमच्या कित्येक पिढ्यांची
शेकडो वर्षांची भरभळ वाहणारी 
दुःख देणारी जखम होती ही
निदान यापुढे तरी आमच्यातील 
निर्लज्ज स्वार्थी सत्तांध उपद्रवी 
तसेच  तथाकथित पुरोगामी वगैरे 
असलेले आमचेच बांधव 
त्यांना तूच बुद्धी दे 

तुझे मुर्त स्वरूप असणे 
तुझे अमूर्त असणे 
आणि तुझे जनमानसात 
विराजमान असणे
 हे त्यांना कळू दे
तुझ्यापासून दुरावलेले तुटलेले 
रागावून गेलेले 
किंवा हिरावून नेलेले तुझे भक्त 
त्यांचा तू पुन्हा स्वीकार कर 
त्यांचा पदरात घे .

सत्व राखणे त्यासाठी बलशाली होणे 
एकत्र राहणे मित्र जोडणे आणि वेळ येतात 
रिपू दमन करणे हे  तुझे सूत्र 
प्रत्येक मनात जागृत राहू दे 
वर्ण जाती भाषा वेष राज्य प्रदेश 
याच्या सीमा पुसून जाऊ दे
तुझे मंदिर अक्षय अबाधित राहू दे 
आणि त्यावर फडफडणारी ध्वजा 
दशो दिशातून दिसू दे
 तुझ्या कृपेने आत्मोध्दार जगदोद्धार
आणि विश्वोद्धार होवू  दे हिच प्रार्थना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

मी आहे


मी आहे
*******
पुंज क्षणाचे मनात दिसले 
जणू अवसेला तारे तुटले ॥

प्रदीप्त मी पण नच मिटणारे
उंच टोक जणू ज्वालेवरले ॥

तीच लाट जणू पुढे धावते 
पळ सातत्य खुळे वठवते ॥

सापेक्ष्याची परि ती किमया 
कळणाऱ्याला हवी कळाया ॥

 या क्षणातच मी पण असते 
जगताचे गूढ द्वार उघडते ॥

माझ्या वाचून जे गीत उमटते
अस्तित्वाचे ते गुंजन असते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

ऐकणरे भेटते तेव्हा

ऐकणारे भेटते तेव्हा
******
जेव्हा कोणी ऐकणारे भेटते तेव्हा 
शब्दांनी भरून येते आकाश अन 
कोसळते अनावर होऊन
थांबवल्या वाचून थांबल्यापासून 
मग पेशी पेशीत दडलेली गुपिते 
उलगडतात ओठावर आपसूक येवून
नाचू लागतात कारंजी बोलण्यातून
 सुखाची दुःखाची अनुभवाची 
काल घडलेल्या प्रसंगाची 
उद्याच्या समायोजनाची 
हळूहळू पोतडी खाली होत असते 
भरलेल्या उधानल्या मनाची 
जेव्हा कोणीऐकणारे भेटते तेव्हा 
भावनांनी भरून येतो मोहर 
मंद मदीर गंध पसरतो आठवांचा 
अगणित अद्भुत विभ्रमांनी 
भरून जाते वर्तमान 
माझे बोल ऐकता ऐकता 
जेव्हा माझेच होते तुझे मन 
बोलणे थांबते जाते थबकून
ओसंडून वाहणाऱ्या प्याल्यागत 
संतृप्ततेचा किनारा गाठून 
आणि तरीही तू उगाचच विचारत असते 
मग अजून मग अजून. . .
तृप्तीच्या शिखरावरील अतृप्त मेघ होऊन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

याचक

याचक
*******
दत्त दारीचा याचक 
काय सांगू त्याची मात 
जय लाभ यश कीर्ती 
असे तयाच्या हातात ॥

जाता दत्ताला शरण 
चुके जन्म नि मरण 
देह उरला नुरला 
कैसे काय ते स्मरण 

जाणे तयाच्या दारात 
भाग्य असे रे जन्माचे 
पडो झोळीत काहीही 
दान मागावे भक्तीचे 

हट्टी होई रे भिकारी 
रहा अडुनिया दारी 
एकरूप त्या होवूनी 
सरो निघणे माघारी

जन्मा आल्याचे फळ 
दत्त दत्तची केवळ 
तया वाचून असती 
लाभ अवघे निष्फळ
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

भाग्यवान

भाग्यवान
*******
तुझी आठवण येते उसवून 
माझ्या मनातून मला चूकवून ॥१

खोल खोलवर बसले दडून
वादळ स्मृतीचे येथे उफाळून ॥२

जनात अलिप्त ते तुझे असणे 
सर अमृताची क्षणाचे पाहणे ॥३

हसल्या वाचून आनंद पेरणे
वदल्या वाचून अपार सांगणे ॥४

आणिक भेटता ते तुझे मी होणे
स्पर्शात चांदणे आभाळ भरणे ॥५

मानावे कुणाचे आभार मी आता
होतो भाग्यवान पदासी चुंबिता ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


 

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

स्वामी समर्थ

श्रीस्वामी समर्थ
*********
स्वामी अक्कलकोट वाला
मैं हूं उनका चेला 
सर पर है आशीष उनके 
हो गया बेड़ा पार मेरा ॥

कौन जान सकता उनको 
छाती ठोककर भला 
उतर आया कैलाश से 
सांब सदाशिव भोला ॥

पाकर मिट्टी पदकमलों की 
संसार हो गया सुहाना 
और दृष्टिके अमृतकणसे
यही मोक्षमय  जीना ॥

कोटि-कोटि हाथो में
लेकर प्रेम प्रसाद 
दे दे प्रसन्न भक्तो को 
जब कर ले वह याद ॥

गया नही मै दूर कही
 हूं हमेशा यहॉ जिंदा 
व्याकुल मनसे पुकार लो
आऊंगा मैं ,उनका वादा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० एप्रिल, २०२४

अधिष्ठान


अधिष्ठान
********
माझिया भक्तीची नको रे प्रचिती 
देऊस पावती दिगंबरा ॥१
काय हा व्यापार चाले व्यवहार
एक एकावर देणे घेणे ॥२
माझिया मनात नुठावे मागणे 
ऐसे तैसे होणे कदा काळी ॥३
घडावे जगणे मध्यम मार्गाने 
तुझिया पंथाने येणे जाणे ' ॥४
असावे अंतरी पूर्ण समाधान
तुझे वस्तीस्थान मनोहर ॥५
घडो हवा तर काही नामजप
काही ध्यान तप तुझी मर्जी ॥६
परीअधिष्ठान जावे न सुटून 
विक्रांत मोडून पडू नये ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

श्रीराम प्रार्थना

श्रीरामास प्रार्थना ********** अयोध्येत पुन्हा विराजमान झाल्यानंतर  हे रामराया, हा तुझा पहीला जन्मदिवस  अतिशय गौरवशा...